पिंपरी :- राज्यात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशभरातील सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. यात समाधानाची बाब म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात करोनाबाधित म्हणून नोंद झालेल्या तीन रूग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांची आता करोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने ते व्हायरस फ्री झाले आहे. पिंपरी चिंचवडमधील करोना विषाणूची लागण झालेले हे पहिले तीन जण करोनामुक्त झाल्याने शहरासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल.
त्यांचे १४ दिवसांनंतर करण्यात आलेल्या दोन चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (Y. C. M) रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. शहरात एकूण १२ करोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी, तीन जण बरे झाल्याने असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केलं आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्रात सर्वाधिक करोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्य सरकार आणि महानगरपालिका प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या. पुण्यातील करोना बाधित दाम्पत्याच्या संपर्कात आल्याने पिंपरी-चिंचवडमधील तिघांना करोनाची बाधा झाल्याची माहिती १० मार्च रोजी समोर आली होती. तिघांवरही महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्यांच्यावर उपचार केले.
गुरुवारी त्यांची १४ दिवसानंतर त्यांची पहिली चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यांची आजची दुसऱ्या चाचणीचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केलं असून डॉक्टरांच मनोबल वाढलेले आहे.