नवी दिल्ली. देशभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 4 हजार 397 झाली आहे. रविवारी सर्वाधिक 605 प्रकरणे समोर आली. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 150हून अधिक, आंध्रप्रदेशात 34, गुजरातमध्ये 14, मध्यप्रदेशात 14, हिमाचलमध्ये 7, राजस्थानात 6, पंजाबमध्ये 3, कर्नाटक-ओडिशा मध्ये 2-2 आणि झारखंडमध्ये 1 रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइटनुसार आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत संक्रमितांची संख्या 4 हजार 67 झाली आहे. यातील 291 बरे झाले असून 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तबलिगी जमात प्रकरणाने संसर्ग प्रकरणांची गती जवळपास दुप्पट झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात तबलिगी जमात प्रकरण उघडकीस आल्यानंतर संसर्ग प्रकरणांची गती जवळपास दुप्पट झाली आहे. मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, तबलिगी जमातीचे प्रकरण झाले नसते तर देशात 7.4 दिवसांत प्रकरणे दुप्पट झाली असती मात्र आता ही संख्या 4.2 दिवसांत दुप्पट होत आहे. ते म्हणाले की, रविवारी देशातील 274 जिल्ह्यांतून कोरोनाचे नवीन प्रकरणे समोर आले होते. बुधवारपासून ज्या ठिकाणी संसर्ग होण्याच्या अधिक घटना घडल्या आहेत त्या ठिकाणी रॅपिड टेस्ट घेण्यात येणार आहे.